शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी करण्यात आली आहे. राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या आणखी एका जवळच्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावर आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रावर याआधीही अशी आक्रमणं झालेली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. जेव्हा इथं निवडणूक लागेल असं कळायला लागलं आणि महाविकास आघाडीची भीती भाजपाला वाटू लागली तेव्हापासून हे सुरू आहे. यूपी, हैदराबाद, बंगालमध्येही असंच केलेलं आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ लागल्या आहेत. म्हणून येथे यांच्या कारवाया सुरू आहेत. केंद्रीय यंत्रणा या आता भाजपाच्या प्रचार यंत्रणाच झाल्या आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते विधानभवनाच्या बाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेआधीच सकाळपासून आयकर विभागानं धाडसत्र सुरू केल्यानं खळबळ उडाली आहे. ईडी आणि भाजपा नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत भाजपाच्या कोणत्या नेत्यांवर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.