काही दिवसापूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या एका शिष्टमंडळाने दिल्लीत गृहमंत्र्यांना भेटून याविषयीची माहिती दिली होती. यासर्व प्रकरणावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांच्या जखमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी,”आमच्या हातातली हिंदुत्त्वाची गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायची आहे, त्यांच्या डोक्यावर जाऊन आपटेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस सध्या राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीकादेखील राऊतांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, जे अस्वस्थ नेते आहेत, अशांत नेते आहेत, त्यांनी आपल्या घरी हनुमान चालिसाचं पठण करावं, त्यांच्या मनाला शांती मिळेल असाही खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यासोबत किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
“महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांना ओळखतात, त्यांना इतकं लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नाही हे कळेल. विरोधकावंर हल्ले म्हणजे काय? कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.”, असं संजय राऊत म्हणाले.