मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ईडी कोठडी दिली. यामुळे अनिल देशमुख १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असतील. याआधी मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. या निकालाविरोधात ईडीने रविवारी उच्च न्यायालयात दाद मागितली. सुटीच्या न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. सुनावणीअंती न्यायालयाने अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली.
याआधी सोमवारी (१ नोव्हेंबर २०२१) सकाळी ईडीच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अनिल देशमुख हजर झाले. सतत मीडियासमोर राहणारे देशमुख वारंवार समन्स बजावूनही ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणे टाळत होते. ईडीने शोधून अटक करण्याची तयारी सुरू केली आणि अनिल देशमुख हजर झाले. देशमुखांची १२ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी झाली. चौकशीत देशमुख यांच्याकडून अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाही. अखेर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली.
अटकेची कारवाई सोमवार-मंगळवार दरम्यान मध्यरात्री झाली. खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीच्या मुंबई कार्यालयाने अनिल देशमुख यांना अटक केली. अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन देशमुखांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. चौकशीसाठी ईडीने देशमुखांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली. या कोठडीची मुदत संपल्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करुन ईडी कोठडीची मुदत वाढवावी, अशी मागणी केली. ही मागणी फेटाळत मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने देशमुखांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली. पण मुंबईच्या उच्च न्यायालयाने हा निर्णय फिरवला. आता अनिल देशमुख १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असतील.
खंडणी वसुली आणि पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची ईडी चौकशी करेल. तर खंडणी वसुली प्रकरणात मुंबई पोलीस दलातून निलंबित केलेल्या सचिन वाझे याला १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. वाझे मुंबई पोलीस दलाच्या क्राईम ब्रँचच्या कोठडीत राहणार आहे. वाझेची चौकशी क्राईम ब्रँच करेल.