मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात या दोन नेत्यांची भेट झाली. जवळपास १ तासांहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे.
आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी आणि शरद पवार यांच्या बैठका कमी झाल्या होत्या. शरद पवार यांच्या शस्त्रक्रियानंतर या दोन नेत्यांची पहिलीच भेट झाली आहे. या भेटीवर आता राजकीय विश्लेषक अशोक वानखडे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे.
शरद पवार पहिल्यांदा पियुष गोयल यांना भेटले आणि त्यानंतर राजनाथ सिंह यांना भेटले. आता त्यानंतर शरद पवार-मोदी भेट होत आहे. या भेटीला निश्चित राजकीय अंग आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील ४८ जागा आहेत लोकसभेचा. त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते, असं मत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. २०२२ मध्ये पाच राज्यांच्या निकालाची वाट पाहण्याची गोष्ट करतात. महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. नाना पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहित आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं असे मत वानखडे यांनी मांडले आहे.