मुंबई | केंद्रात मोदी मंडळाच्या विस्तारापूर्वी सहकार खात्यांची निर्मिती करण्यात आली असून या खात्याचा कारभार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने थेट मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. मात्र दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
केंद्र सरकारला सहकारात काही मदत करायची इच्छा असेल, म्हणून त्यांनी नव्या मंत्रालयाची स्थापना केली आहे. परंतु, सहकार हा राज्याचा विषय आहे. अमित शहांकडे सहकार खात्याची जबाबदारी गेल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. शहांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणतील. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो, असे मत संजय राऊत यांनी मांडले आहे.
तसेच अमित शहा हे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना क्षेत्रात काही चांगलं काम करावसं वाटत असेल, त्यामुळे ते खातं त्यांनी त्यांच्याकडे घेतलं असेल. ते सहकार क्षेत्रासाठी चांगले आणि सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्ही आशा करतो, असा चिमटाही त्यांनी काढला.
अमित शहांकडे सहकार खात्याची जबाबदारी गेल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेमध्ये केलेले आहेत. त्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्याने निमाण करण्यात आलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.