शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी युपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना मिळावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वी पत्रकार माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. या मागणीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का असा सवाल विचारला होता. तसेच त्यांनी प्रवक्ते पद स्वीकारल्यानंतर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ असे त्यांनी बोलून दाखविले होते. आता पटोले यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
राऊत म्हणाले की, युपीए अध्यक्षपदाचा विषय हा केंद्रातील चर्चेचा विषय आहे. राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी याविषयी काही बोलले तर आम्ही उत्तर देऊ. देशात विरोधी पक्षांची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भारतीय जनता पक्षाचा पराभव कसा करणार, याचं उत्तरही या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, युपीए विषयी बोलण्यासाठी त्याचा भाग असलंच पाहिजे, हे गरजेचे नाही. या देशात भारीत्या जनता पक्षविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी उभी करायची असेल तर UPA विषयी चर्चा झाली पाहिजे. ही गोष्ट महाराष्ट्रातील नेत्यांना उमजत नसेल तर त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हणत पटोले यांना टोला लागलेला होता.