उत्तराखंडमध्ये येत्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याच्या वक्तव्यावरही मुख्यमंत्री शर्मा यांनी टीका केली.
मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत ‘तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? आमच्या सैनिकांनी संपावर गेल्याचे सांगितले असेल, तर पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला असे म्हटले तर ते फोडलेच आहेत,’ असे हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले.
‘लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का, असा सवालही त्यांनी केला. तुमचा बिपिन रावत यांच्यावर विश्वास नाही का? तुम्हाला पुरावा का हवा आहे? सैनिकांचा अपमान करणे बंद करा. देश आघाडीवर आहे. देशासाठी लोक जगतात आणि मरतात,’ असे शर्मा यांनी म्हटले. तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा काँग्रेसने ध्रुवीकरणाच्या राजकारणात प्रवेश केला आहे, असे म्हटले आहे.