मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज धर्मवीर चित्रपटाचा विशेष शो पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अभिनेता प्रसाद ओकचं तोंडभरून कौतुक केलं. मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. इतकी जिवंत व्यक्तीरेखा प्रसाद यांनी साकारली आहे, असं ठाकरे म्हणाले.
दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी उत्तम साकारली आहे. आनंदजींच्या लकबी त्यांनी कशा आत्मसात केल्या माहीत नाही. पण मी चित्रपट पाहतोय असं मला वाटलंच नाही. प्रसाद ओक यांनी कमाल केलीय. त्यांचे मनापासून धन्यवाद, अशा शब्दांत ठाकरेंनी प्रसाद ओकचं कौतुक केलं.
चित्रपट पाहिल्यावर उद्धव ठाकरेंनी प्रसाद ओक यांचं कौतुक केलं. आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला. गुरु-शिष्याचं नातं कसं असावं, त्यांचा एकमेकांवर किती विश्वास असावा, ते धर्मवीरमध्ये पाहायला मिळालं. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या गुरु-शिष्याचं नातं मी जवळून पाहिलं आहे, असं ठाकरे म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलून उद्धव ठाकरे तिथून निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं. त्यावर त्यांना गुरु शिष्याचं नातं सांगण्यात काही अर्थ नाही, असा टोला ठाकरेंनी लगावला.