मुंबई | शेजारच्या बीड जिल्ह्यात जायचे तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना राग येईल का, असा प्रश्न पडतो. मात्र, इथे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र बसून छान बोलत आहेत. याचा अर्थ तुमचं बरं चाललंय. आम्हीच विनाकारण विचार करत राहतो, असे म्हणत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जोरदार फटकेबाजी केली. तुमच्या घरोब्यात आता आम्हालाही सामील करून घ्या, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना चष्मा लागला, आपल्याला अद्याप नाही. मुंडे-महाजनांच्या लेन्समधून पाहत मोठे झालेले व शरद पवार यांच्या लेन्समधून बघणारे माझे बंधू, असा उल्लेख करून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वेगवेगळ्या लेन्सचा संदर्भ देत राजकीय गुगली टाकली. ती परतवून लावताना महाविकास आघाडीच्या लेन्समधून तुम्ही आता बघितले पाहिजे, असे आपल्याला आताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याचा फटका धनंजय मुंडे यांनी लगावला, आणि सभागृहात हंशा पिकला.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मला बोलायचे नाही, असे सांगत राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत चांगल्या कामासाठी एका व्यासपीठावर जमणारे नेते आणि त्यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. इथे एका व्यासपीठावर जमलेले सर्वपक्षीय नेते त्याचे प्रतीक आहेत, अशा शब्दात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजकीय भाष्य केले.