भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. यानंतर भारतातच नाही तर जगभरातून याचे पडसाद उमटत आहेत. त्यातच अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतातील अनेक शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या समाना अग्रलेखातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
एका बाजूला कश्मीर पेटले आहे. तेथे अतिरेक्यांकडून हिंदू रक्ताचे सडे पाडले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला ‘अल कायदा’ने दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर आपल्या लाडक्या मोदी सरकारने खबरदारीची योजना म्हणून काय करावे? ज्या सडक्या मेंदूच्या महिला प्रवक्त्याने मोहम्मद पैगंबरांचा अपमान केला, त्या महिलेची सुरक्षा व्यवस्था वाढवली. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
धोका देशाला आहे, भाजपला नाही हे त्यांना कोणी सांगायचे? गरळ ओकणाऱ्या महिला प्रवक्त्यास ‘झेड’ सुरक्षा पुरवल्याने ‘अल कायदा’चे हल्ले रोखले जातील काय? पुन्हा त्या महिला प्रवक्त्याच्या भयंकर वक्तव्याचे खुले समर्थन कंगना राणावत या नटीने केले. भाजपाने किती सडक्या कांद्यांना पदरी बाळगले आहे हेच त्यातून पुन्हा दिसले.
तसेच उद्या देशात दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरू झालीच तर जनतेच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय योजना केली आहे? मोदी, शहा वगैरे प्रमुख नेत्यांना सुरक्षेचे अभेद्य कवच आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यांचे बालबच्चेही त्याच सुरक्षेच्या पिंजऱ्यात सुखरूप राहतील, पण उद्या ‘अल कायदा’सारख्यांनी सार्वजनिक ठिकाणी घातपाती कृत्ये घडवलीच तर सामान्य जनतेच्या जिवाची शाश्वती काय? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.