विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर प्रदेश भाजपच्या बैठकांना जोर आला आहे. अधिवेशनासाठीची रणनीती तसेच पक्ष कार्याला गती देण्यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज दिवसभर बैठकी झाल्या.
या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर ती लढायची, असा निर्णय झाल्याचे कळते. मात्र, काँग्रेसकडे अध्यक्षपद जाणार असल्याने शिवसेना व राष्ट्रवादीच ही निवडणूक घेण्यास फारसे इच्छुक नसेल, असा सूर भारतीय जनता पक्षाच्या गोटात आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. संपूर्ण अधिवेशन झाले असते तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारने यापेक्षा अजून छोटे अधिवेशन ठेवता येत नाही की काय म्हणून दोन दिवसाचे अधिवेशन ठेवले आहे. कोरोना, शेतकऱ्यांचे प्रश्न आदींवरून दोन दिवसाच्या अधिवेशनातही सरकारला आम्ही कोंडीत पकडू असे विधान सुद्धा त्यांनी केले आहे.