जळगाव | पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप लगावला आहे माझ्या चौकशा करणे, बदनामीचा प्रयत्न करणे, अंडरवर्ल्ड डॉनशी माझे संबंध जोडणे, मी भूखंडात गैरव्यवहार केल्याचा खोटा आरोप करणे अशा नाना प्रकारे वारंवार मला छळण्याचे प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच झाले असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
खडसे यांनी आज फडणवीसांवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, जेव्हा फडणवीस विधिमंडळात पाचव्या टेबलावर बसत होते तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलावर बसण्यासाठी मदत केली होती. त्यांना वारंवार बोलण्याची संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव मी सहमती दिली.
तसेच माझ्या सहमतीसाठी ते अडून राहिले होते, याची आठवणही खडसे यांनी करून दिली. गोपीनाथ मुंडे जर आज असते तर त्यांनी राज्यातील राजकीय स्थिती बदलली असती. त्यांनी मुख्यमंत्रीपद बदलले असते. राज्याच्या राजकारणात गेल्या 5-7 वर्षांत जे अनुभवले तो प्रकार झाला नसता, असेही खडसे म्हणाले. आता खडसे यांच्या या टीकेला भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.