पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध पेटलेले दिसून येत असून अशातच देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बमुळे राज्यांच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले होते अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राणे कुटुंबियांनी पवारांवर केलेल्या विधानाचा समाचार घेतला होता.

राऊत यांनी यावेळी त्यांनी नितेश आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला. राज्यात राजकीय मतभेद असू शकतात. मात्र जी भाषा शरद पवार यांच्याबद्दल वापरली जाते ती अत्यंत खालच्या स्तरावरची आहे. आम्ही काही बोललो तर आम्हाला पवारांचे चेले म्हणतात. हो आहे मी त्यांचा चेला. पण तुम्हाला अशी असंसदीय भाषा वापरणं शोभतं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच शरद पवार यांच्याबद्दल राणे पुत्र बोलतात हे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का? असा सवाल करत जर त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी बोलायला हवं असं राऊत यांनी म्हटले आहे. आता या टीकेला राणे कुटुंबीय काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.