नवी दिल्ली | सतत वादग्रस्त वक्तव्य करत आणि आपल्याच पक्षाला घरचा आहेर देणारे खासदार सुब्रमण्यम स्वामीं यांच्या अडचणी वाढताना दिसून येणार आहे. त्यातच आता दिल्ली भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना अब्रूनुकसानीची दिवाणी आणि फौजदारी कारवाईची नोटीस पाठवली आहे.
तेजिंदर पाल सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी तेजिंदर पाल सिंग हे अनेकदा छोट्या-मोठ्या गुन्ह्यासाठी तुरुंगात गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना याची माहिती पाहिजे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. यात त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराचा हवाला दिला होता. परंतु त्याचे नाव दिले नव्हते.
सुब्रमण्यम स्वामी यांनी हे ट्विट केल्यानंतर तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी त्यांना ४८ तासांची मुदत दिली होती. आरोप सिद्ध करा अन्यथा कायदेशीर कारवाई करीन असा इशारा बग्गा यांनी दिला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी ४८ तास उलटल्यानंतरही खुलासा न केल्यामुळे तेजिंदर पाल सिंग यांनी सुब्रमण्यम स्वामींना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे.