बारामती |उसाचे क्षेत्र वाढत असल्याने विस्तारीकरण करत आहात ही चांगली बाब आहे. मात्र, विस्तारवाढ करताना कर्ज उभे करावे लागणार आहे. त्यामुळे काही काळ दरासाठीचे भांडण टाळा. कर्ज फिटेपर्यंत जपून कारभार करा. कर्जातून बाहेर पडल्यावर वाढलेल्या प्रकल्पांमुळे उत्पन्नवाढीचा फायदा तुम्हालाच मिळणार आहे,” असा वडिलकीचा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला. तसेच इथेनॉल निर्मितीवर भर द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी याबाबत माहिती दिली.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाशी गोविंदबाग (ता. बारामती) या निवासस्थानी पवार यांनी हितगूज केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक विश्वास जगताप, संग्राम सोरटे, लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, प्रणिता खोमणे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ”पुढील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिर राहतील. साखरनिर्मितीसोबत पुढील काळात इथेनॉलकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. विस्तारीकरणाच्या कालावधीत कर्जफेड होईपर्यंत काळजीपूर्वक काम करावे.’ मागील तीन वर्षात एकट्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात १ लाख ३३ हजार टन ऊस जळाला आहे. यामध्ये वीजकंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळाल्याचे प्रमाण बहुतांश असून कंपनी नुकसान भरपाई देत नाही, यास्तव पूर्ण वेळ स्वतंत्र अधिकारी नेमावा, असे निवेदन पवारांना देत चर्चा केली.