महाराष्ट्रात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केले होते. अनेकदा राज ठाकरे यांनी परप्रांतीय मुद्द्यावरून भाष्य केले आहे. आता त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरूपण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
‘बहिरा नाचे आपन ताल!’ म्हणजे ‘बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते’ अशा अर्थाची टीका निरुपम यांनी केली आहे. दरम्यान काल मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले होते.
मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे सुरुवातीपासूनच करत आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परप्रांतीयविरोधी धोरण सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी परप्रांतीय मजूर मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जात असतानाही राज ठाकरेंनी त्यांना परत घेताना मोजणी आणि चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तर दुसरीकडे, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परप्रांतीयांविषयी कायम कणव बाळगला आहे. कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयविरोधी सूर आळवल्याने निरुपम यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंना टोला लगावला आहे.