नाशिक : सध्या संपूर्ण राज्यभरात कोरोनाने हौदोस घालायला सुरवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. त्यात सर्व सामान्य लोकांप्रमाणे राजकीय पुढारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.
त्यातच नाशिकमध्ये असाच एक घडलेला प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रियंका घाटे यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घालत तोडफोड केली. या तोडफोडीमुळे रुग्णालयाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर मानवता केअर हॉस्पिटल मुंबई नाका येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी रात्री रोशन घाटे यांचं कोरोनामुळे निधन झालं. भावाच्या निधनामुळे प्रियंका घाटे यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटल प्रशासनावरच आरोप करत जोरदार गोंधळ घातला.
हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ धक्काबुकी करण्यात आली. एवढंच नाहीतर संतप्त झालेल्या समर्थकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. हॉस्पिटलच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. हॉस्पिटलमध्ये तोडफोडीनंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नवा पेचप्रसंग उभा राहिला आहे.