राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने कहर करायला सुरवात केली आहे. त्यात दररोज ६० हजारांच्यावर कोरोना रुग्णसंख्या सापडताना दिसत आहे. आज महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक चिंतादायक बनत चालली आहे. त्यात एकीकडे ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर विरोधकांकडून टीका होत असतानाच आता काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला.
काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.
आशीष देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान दोन महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे, असे आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे.