संपूर्ण देशात कोरोनाचे संकट अधिक बिकट बनत चालले आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. मात्र या संकटात सुद्धा भाजपा नेते आणि त्यांच्या पक्षाशी निगडित मंत्री वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करण्याचे काम करताना दिसत आहे. त्यातच कोरोना संसर्गाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे.
कोरोना झालेल्यांनी काय काय खावे याची पूर्ण लिस्टच हर्षवर्धन यांनी जारी केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. योग करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घ्या. त्यामुळे कोविडचा सामना करण्यास मदत मिळेल, असं हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
डार्क चॉकलेटमध्ये 70 टक्के कोको कंटेन्ट असतं. त्यामुळे कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते, म्हणून डार्क चॉकलेट खा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हर्षवर्धन यांनी हा सल्ला दिल्यानंतर पुण्यात आणि भोपाळमध्ये संशोधन करणारे अनंत भान डार्क चॉकलेट खाल्ल्याने कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते याला आधार काय? असा सवाल केला आहे. डार्क चॉकलेट घेणं किती लोकांना परवडणार आहे?, असा सवालही भान यांनी केला आहे.
हर्षवर्धन यांनी डार्क चॉकलेटसह अन्य पदार्थांची यादीही दिली असून त्यातून इम्युनिटी पॉवर वाढत असून स्ट्रेसही कमी होत असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी शरीरात अधिकाधिक व्हिटॅमिन जाण्यासाठी भाजीपाला आणि फळांचं सेवन वाढवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.