राज्यात ईकडे आघाडीचे सरकार मिळून काम करत असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी स्वबळाची नार देऊन आघाडीत बिघाडी आणण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर आता मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांच्या समोरच नाना पटोले यांना जोरदार टोला लगावला आहे.
मुंबईमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अशोक चव्हाण , पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वबळाच्या नारेबाजीवरही उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. ते म्हणाले, आता जेवणाचा विषय निघाला चांगलं झालं, कोरोनाची भीती बाळगू नका बाळासाहेब, आम्ही सुद्धा स्वबळावर येणार, स्वबळावर म्हणजे आम्ही स्वत: चालत येऊ, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहत नाना पटोले यांना टोला लगावला.
तर अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी स्थापन झाली तेंव्हा एकोपा निर्माण व्हावा यासाठी नवा पायंडा पाडला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांना एकत्र जेवणं दिलं. मग मी सर्वांना एकत्र जेवण दिलं. पण, मी आता अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या निमंत्रणाची वाट बघतोय.अजित पवारांनी निमंत्रणाचं विचारताच, यावेळी लगेच अशोक चव्हाण यांनी अहो, कोरोना आहे सध्या’ असं म्हणताच सभागृहात पुन्हा एकच हशा उडाला.