सध्या काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या होर्डींगचा फोटोही सध्या व्हायरल होत आहे. या उपक्रमावरुन आता भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर खोचक टिपणी केली आहे. एवढ्या पैशात ५० छत्र्या आल्या असत्या म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा. या होर्डिंगच्या किमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या.” पुणेकरांसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. याच उपक्रमामुळे भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
त्यातच काँग्रेसकडून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद दिला होता. पहिल्याच दिवशी पुणेकरांनी काँग्रेस भवनात आपल्या बिघडलेल्या छत्र्या घेऊन दुरुस्तीसाठी मोठी गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. १७ जून ते १९ जून पर्यंत सकाळी ११ ते ६ या वेळात काँग्रेस भवनात नागरिकांना आपल्या छत्र्या मोफत दुरुस्त करुन मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्याने या उपक्रमाद्वारे त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे,