मुंबई : अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
संजय राऊत यांच्या या विधानानंतर राष्ट्र्वादीने सुद्धा त्यांना खडेबोल सुनावले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवाब मलिक, जयंत पाटील या सारख्या राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी संजय राऊतांवर टीका केली होती.
यावर आता खुद्द राष्ट्रवादींचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत राऊतांना खडेबोल सुनावले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून काम करते आहे. या सरकारमध्ये कोणाला मंत्री करायचे, हा त्या त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी, विशेषतः या तीन पक्षांमध्ये असलेल्या कुणीही त्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये, असं अजित पवार यांनी म्हंटले आहे.