पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखे बसवून ठेवल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात वेगळेच चित्र बघायला मिळाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. कोरोनाशी लढा देण्यात मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे यश येत असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले आहे.
या कौतुकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही या बैठकीनंतर स्वत: डॉ. भोसले यांना फोन करून त्यांचे कौतुक केले. आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी यांची माहिती पंतप्रधानांना दिली.
यावर पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. पण, डॉ. भोसले यांनी प्रत्येक उपायाची माहिती सांगताना त्याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. पंतप्रधान मोदी यांनी याआधी अशा आढावा बैठकांतून मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांना बोलण्याची किंवा पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची वेळ आज आली नसली तरी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करून याही वेळी त्यांना देशपातळीवरील बैठकीत चर्चेत ठेवले