( मुंबई प्रतिनिधी) मागच्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर दबाव आणून त्यांतील काही नावे मंजूर करण्याचा विचार ठाकरे सरकार करत आहे. यासाठी राज्यपालावर दबावतंत्राचा वापर करून काही नावे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे.
यापूर्वी राज्य सरकारकडून १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अनेक पत्रं पाठवण्यात आली होती. त्यानंतर स्मरणपत्र पाठवून राज्यपालांना वेळोवेळी या गोष्टीची आठवणही करुन देण्यात आली. सुरुवातीच्या काळात राज्यपालांकडून कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी झालेला असताना सुद्धा राज्यपाल या प्रकरणात लक्ष देताना दिसत नाही.
त्यामुळे आता ठाकरे सरकारने कायदेशीर डावपेच वापरायचेच ठरवले आहे. त्यासाठी अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्या सल्ल्याने राज्य सरकारकडून एक पत्र लिहण्यात आले आहे. हे पत्र आता राज्यपालांना पाठवले जाईल. या पत्रात कायदेशीर युक्तिवाद करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्यपाल १२ पैकी सरकारने सुचविलेल्या काही नावांना तरी मंजुरी देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.