बिहार | लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षात अनेक भूकंप झाले होते. त्यातच आता बिहारच्या राजकारणात मोठ्या बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनाच पक्षातून बेदखल करण्याची तयारी सुरु आहे. काकासह पाच खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चिराग पासवान यांना वगळता लोजपचे उरलेले पाचही खासदार वेगळा गट बनवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे खासदार जेडीयू नेत्यांच्या संगनमताने हे राजकीय षडयंत्र रचत असल्याची चर्चा आहे. पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनाच लोक जनशक्ती पक्षातून बेदखल करण्याची तयारी सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पशुपती कुमार पारस, प्रिन्स राज, चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली केशर हे पाच खासदार जेडीयूमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची विनंती केली. अशावेळी बिहारच्या राजकारणात एकाकी पडलेल्या चिराग यांना मोठा झटका बसू शकतो. राम विलास पासवान यांचे ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्याआधी ते आजारी होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. राम विलास पासवान यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची हाजीपूरची जागा धाकटे बंधू पशुपती कुमार पारस यांना दिली होती. त्यानंतर ते राज्यसभेवरुन संसदेत गेले.