मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १ मे रोजी सभा घेत अनेक मोठी वक्तव्ये केली. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढत राज्य सरकारला ३ मे चा अल्टीमेटम दिला. तर फडणवीस यांनी बाबरी मशिदवरून शिवसेनेवर निशाणा साधला. यालाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले आहे.
“फडणवीस म्हणतात, ‘बाबरी आम्हीच (म्हणजे त्यांनी) पाडली. तुम्ही भोंग्यांनाही घाबरता.’ शिवसेनेने घाबरण्याचा किंवा न घाबरण्याचा प्रश्न येतोच कोठे? लोक श्रीरामाचे भजन करतात. भाजपावाले आता ऊठसूट बाबराचे भजन करू लागले आहेत. हा बदल बरा नाही. धमक्या व इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का व कसे घाबरताय त्यावर बोला. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य घुसल्यापासून कोणाची कशी हातभर फाटली आहे ते देशाने पाहिले आहे. बाबरी आम्हीच पाडली असे सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही. चीननेही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावले आहेत व ते देशाला आव्हान देत आहेत की, ”आम्ही येथून बाहेर पडणार नाही!” मग ते भोंगेही उतरवा व चिन्यांनाही हाकला. तरच तुम्ही हिमतीचे. असे थेट आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत शिवसेना हिंदुत्व रक्षणाची ढाल म्हणूनच वावरली आहे, पण या लढाईत भाजपा व त्यांची आजची उपवस्त्रे कोठे होती? आता या मंडळींना हिंदू हिंदूंतच दंगली पेटवायच्या आहेत. मुंबईत मराठी माणसांत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले नाहीत. आता हिंदूंनाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरवायचे हा कावा स्पष्ट दिसतो आहे.