मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी १५ ऑगस्टपासून मुंबईकरांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करताना त्यांच्या मागे ठेवलेल्या झेंड्यांवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.
पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केली असून ती सध्या चर्चेत आहे. सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या लाइव्ह भाषणामधील स्क्रीनशॉर्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
‘भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती,’ असे म्हणत सरोदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.
पुढे या पोस्टमध्ये सरोदे यांनी मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये असेही म्हटले आहे. ‘ खरे तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये. दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला उत्सवी स्वरूपात मिळविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो. अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्म ध्वजच महत्वाचे आहेत,’ असा टोलाही सरोदे यांनी लगावला आहे.