मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना भाजपने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनात सहभाग घेण्याचे जाहीर केले होते. याच मुद्द्यावरून आता भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठाकरे सरकारच्या मनात कधीच नव्हते. जाणून बुजून ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात तांत्रिक बाजू मांडल्याच नाहीत. जे मराठा आरक्षण भाजपाच्या फडणवीस सरकारने पाच वर्षे टिकवले, ते बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला.
जळगाव दौऱ्यावर आलेल्या निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका मांडली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदू पटेल उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला आहे आणि आरोप केंद्र सरकारवर करीत आहेत. त्यांना हा विषयच समजलेला नाही. ठाकरे सरकारमध्ये या विषयाचा अभ्यास करणारा एकही व्यक्ती नाही.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आवश्यक असलेले संदर्भ, नोंदी सादर केल्याच नसल्याने आरक्षण टिकले नाही. अशोक चव्हाण या समितीमध्ये असल्याने आम्हाला खात्री होतीच की आरक्षण टिकणार नाही, नाकारले जाणार आणि तसेच झाले. हे जाणून बुजून केले गेले याबाबत माझ्या मनात शंकाच नाही अशा शब्दात निलेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केलेत. मागास आयोग स्थापन करून मागासलेपणा सिद्ध करावा लागेल हेच ठाकरे सरकारला महिन्यापर्यंत माहीत नव्हते.
केंद्राकडे बोट दाखविले जात असले तरी या बाबी राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजे होत्या पणउद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना यात रस आहे, असे वाटत नाही, या सर्व कारणांमुळेच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे. हातात कागद न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांना यातील एक मुद्दा देखील सांगता येणार नसल्याची टीकाही यावेळी निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीला जाणार आहेत, यावर बोलताना त्यांची आरती ओवाळायची का ? म्हणत ते घरातून बाहेर निघाले तेच खूप आहेत. असा टोलाही राणे यांनी लगावला