राज्यात लॉकडाऊन जाहीर करून सुद्धा मोठया प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. मात्र कोरोनावरून अद्याप विरोधकांनी राजकारण सुरूच ठेवले आहे याच मुद्द्यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. कोरोनाचा संसर्ग मोठा आहे. देशभर चिता जळत आहेत. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळून टाका, असा टोला त्यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला आहे. ते मुंबई येथे पत्रकार मद्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांना हे आवाहन केलं. मी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. पहिला संसद भवन परिसरात घेतला होता. आता मुलुंडच्या फोर्टिसमध्ये घेतला. लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी लसीकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनाचा सुद्धा समाचार घेतला होता. लसीकरणावर राजकारण करू नका. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा आणि शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळा, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका, असंही ते म्हणाले.