मुंबई | मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचनालया अर्थात ईडीने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ५ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर सकाळपासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु होती. ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्या आली. तर दुसरीकडे मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. सोशल मीडियावरुनही समर्थन आणि विरोध दिसून येत आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या मलिक यांना ईडीने बुधवारी सकाळीच ताब्यात घेतले. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना मलिक यांनी बाहेर उभा असलेल्या समर्थकांना हात उंचावून आपण घाबरणार नाही, लढणार… असा आक्रमक पवित्रा दाखवून दिला. तसेच, यावेळी हात उंचावलेले मलिक यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मात्र दुसरीकडे मलिक यांच्या विरोधकांनी सोशल मीडियावर त्यांचे काही जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये, रागयडावर शिवाजी महाराजांचा जयघोष करताना राष्ट्रवादीचे नेते दिसून येतात. या फोटोत मंत्री नवाब मलिक हेही आहेत. मात्र, जयघोष करताना सर्वच नेत्यांनी हात उंचावून अभिवादन केलं आहे. पण, नवाब मलिक यांनी हात उंचावलेला दिसत नाही. हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. त्यावरुन, मनसेनं मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मनचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विट करुन मलिक यांच्या रायगडावरील आणि ईडी कार्यालयाबाहेरील फोटो शेअर केला आहे. तसेच, छत्रपतींचा जयघोष करताना हात वर होत नव्हते, पण ईडीचा घोडा लागताच हात वर केले… असा आशयही शेअर केला आहे.