पुणे | मोदी सरकारच्या मंत्री मंडळात काही मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना सनदी देण्यात आलेली आहे, याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला आहे. केंद्र सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही इंजिनच खराब झाले आहे अशी खमखमीत टीका केंद्रातील मंत्रिमंडळ बदलावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पुण्यात काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना पटोले म्हणाले, भाजपाची संस्कृतीच खोटे बोलण्याची आहे. मोदी सत्तेवर आले ते खोटे बोलूनच सत्तेवर आले आहे. परवा विधानसभेत विरोधी पक्षनेते खोटे बोलले. एकीकडे शिव्यांसाठी माफी मागतात. दुसरीकडे शिव्या दिल्याच नाही म्हणतात. त्यांचे सगळे हेच सुरू आहे असे पटोले म्हणाले.
काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा मुद्दा नाहीच, अंतर्गत लोकशाही आहे. आता सर्वांना राहुल गांधी बरोबर वाटतात. नोटाबंदी, जीएसटी, कोरोना यावर त्यांनी मांडलेले मुद्दे बरोबर असल्याचे देशाला पटू लागले आहे. देशात बदल होणार याचेच हे चिन्ह असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. आता पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.