नवी दिल्ली | सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान मंगळवारी भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली.या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी मोदींनी अधिवेशनात गैरहजर राहणाऱ्या भाजप खासदारांना कडक शब्दात इशारा देत हिवाळी अधिवेशनात आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे.
यावेळी गैरहजर खासदारांची पंतप्रधान मोदींनी शाळा घेतली होती. मोदी म्हणाले, ‘मी तुम्हाला नेमहीच संसदेत उपस्थित राहण्यास सांगत असतो. तुमच्या अनुपस्थितीमुळे कामांवर परिणाम पडतो. यापुढे सर्व खासदारांनी नियमितपणे संसदेत आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकांना उपस्थित राहावे. लहान मुलाप्रमाणे सतत सांगणे मला आवडत नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल केला नाही, तर भविष्यात मला तुमच्या संदर्भात मोठा बदल करावा लागेल’, अशा कडक शब्दात मोदींनी गैरहजर खासदारांना इशारा दिला आहे.
बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या मतदारसंघात जाऊन जिल्हाध्यक्ष आणि इतर स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, स्थानिक पातळीला पक्ष मजबूत करण्यासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाये आयोजन करण्यास सांगितले आहे. याच अनुषंगाने येत्या 14 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी त्यांचा मतदारसंघ असलेल्या बनारसमध्ये सर्व भाजप नेत्यांना चाय पे चर्चा कार्यक्रमासाठी बोलवणार आहेत.