भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना “तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा.”, असा खोचक सल्ला दिला आहे. यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात असताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी खोचक ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. “‘बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते’ चंद्रकांत पाटील तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते. सहकुटुंब अवश्य या.”, असे ट्वीट विद्या चव्हाण यांनी केले आहे.
“तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या.”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
देशात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण दिल्याने महाराष्ट्राच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दिल्लीत बैठक झाली. त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचे म्हटले. तर यावरच प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक सल्ला दिला.