राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीमध्येही घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे.भाजपने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून रिंगणात असल्याची माहिती दिली. त्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असेल, असे ते म्हणाले. सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते असल्याचे ते म्हणाले. विवेक बुद्धीला स्मरून सदाभाऊंना मतदान होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत, याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
भाजपने विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे , प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपच्या पाठिंब्याने सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार असतील. आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे सहा भाजपचे सहा उमेदवार आहेत.
तसेच राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.