कोल्हापूर | ‘कोल्हापूर उत्तर’साठी भारीत्या जनता पक्षाने जोर लावला असून, भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या शनिवारी सायंकाळी ७ वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने होणार आहे, तर खासदार उदयनराजे यांचा आज शुक्रवारी रोड शोही आयोजित करण्यात आला आहे.
अशातच काल झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. पाच वर्षे तुम्ही पालकमंत्री, राज्याच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री होता, तेव्हा कोल्हापूर शहर, जिल्ह्याच्या विकासाठी काय केले?
सत्तेत असताना तुम्ही येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाला दमडीचीही मदत केली नाही. ते आता कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, अशी विचारणा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी येथे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, शिवाजी पेठेत जे ठरते, ते राज्यात आणि देशात पसरते. यामुळे शिवाजी पेठेेने भरघोस मते देऊन जयश्री जाधव यांना आमदार करावे. कोल्हापूरला छत्रपती ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. त्याच भूमीत विरोधकांकडून एका प्लंबरचे, इलेक्ट्रिशियनचे काम त्यांच्या पत्नीला जमते का ? ज्यांचे काम त्यांनीच करावे, असे सांगत महिलांचा अवमान केला आहे.