चंद्रकांत पाटलाला एवढी मस्ती कुठं आली असा घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेला संबोधित करताना केली होती. आता या विधानाचे पडसाद चांगलेच उमटू लागले आहे. यावर आता भाजपने मुश्रीफ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
‘चंद्रकांत पाटील यांचा प्रवास साऱ्या महाराष्ट्रभर होत असतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात ते उमेदवारी करू शकतात. त्यामुळं निवडून येण्यासाठी ते पुण्याला पळून गेले असं म्हणणं कितपत योग्य आहे हे हसन मुश्रीफ यांनीच तपासावं, असे सांगतानाच, ‘मुश्रीफ यांनी महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावे असा आव्हान भारतीय जनता पक्षाने केले आहे.
चंद्रकांत पाटील हे अतिशय भित्रे आहेत. ते अपघातानं मंत्री झाले होते. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सोज्वळ व्यक्तीबद्दल बोलणं चांगलं नाही अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती. आता भाजपने पत्रकाद्वारे या टीकेला उत्तर दिले आहे.
‘करोना महामारीत महाराष्ट्राला सावरण्यात आलेलं अपयश, सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार, गृहमंत्र्यांची पोलिसांकडे महिन्याला १०० कोटी खंडणीची मागणी अशा अनेक प्रकरणांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी मुश्रीफ हे चंद्रकांत पाटील यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत असा टोला लगावला आहे.