नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची लवकरच कारवाई होईल असे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. पाटील यांचा रोख कॉंग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. पाटलांचे वक्तव्य म्हणजे निवडणूक पाहून खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे. चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? असा सवाल करत लोकशाहीत असे अपेक्षित नसल्याचे चव्हाण म्हणाले.
तसेच चव्हाण पाठोपाठ आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पाटील यांच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी हा प्रकार केला जातो. ईडी विषय आता नेहमीचा झाला आहे. त्याला घाबरण्याचे कारण नाही, असे नाना पटोले म्हणाले. मात्र पुन्हा एकदा ईडीच्या कारवाईमुळे राज्याचे राजकारण तापलेले दिसून येत आहे.
कॉंग्रेस याला घाबरणार नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नावर केंद्र सरकारविरोधात लढत राहणार. स्वीस बॅंकेत काळा पैसा वाढला आहे. हे पैसे भाजपच्या लोकांचे आहेत का? सगळे चोर आणि हे साव अशी भूमिका भाजपवाले घेत आहेत. पण लोक आता त्याला हसत आहेत. अमित शाह यांच्या मुलाचे उत्पन्न एका वर्षात 9 हजार पटीने वाढले असेल तर मोदींच्या बाजूला बसणाऱ्या अमित शाह यांनाच भीती वाटायला हवी, असा टोला पटोले यांनी लगावला.