पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेला विस्तार, मित्रपक्षांनी सोडलेली साथ, नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले नेते या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला घरचा रास्ता दाखवण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपमध्ये दाखल झालेले फायरब्रँड नेते नारायण राणे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे
खासदार नारायण राणे यांनी दिल्लीवारी केली होती. या दिल्ली दौऱ्यानंतर नारायण राणे यांचा मोदींच्या मंत्रिमंडलात समावेश होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. अद्याप भाजपकडून अधिकृत नावं जाहीर केलेली नाहीत. मात्र महाराष्ट्रातून दोन-तीन नावं चर्चेत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे नारायण राणे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का असा प्रश्न आज नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. “केंद्रातील मंत्रिपदाबाबत भाजपाचे नेते निर्णय घेतील, त्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही. ज्यांना केद्रांत पाठवतील ते जातील” असं नारायण राणे म्हणाले. त्यामुळे एकप्रकारे नारायण राणे यांनी केंद्र स्थान मिळणार असल्याचे एकप्रकारे संकेत दिले आहे.