मुंबई | पुण्यातील आंबिलओढा परिसरातील अतिक्रमणात असणारी घरं हटवण्यासाठी ओढ्यालगत असणाऱ्या घरांवर पुणे मनपाच्या आदेशावरून बुलडोझर चालवला गेला. यावेळी रहिवाशांना घरातून बाहेर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. प्रशासनाने कोणताही मागचापुढचा विचार न करता गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवला. गरीब रस्त्यावर आले. यावेळी पोलीस आणि रहिवाशांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली पाह्यला मिळाली होती यावर मोठ्या प्रमाणात रहिवाशांचा आक्रोश पाहायला मिळाला होता. या सर्व प्रकरणावर शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातुन पुणे मनपात सत्तेत असलेल्या भाजपावर सडकून टीका केल आहे.
अनधिकृत, बेकायदेशीर घरांचा आणि झोपड्यांचा प्रश्न मुंबईतच नाही तर पुणे, पिंपरी, चिंचवडसारख्या शहरातही वाढला आहे. पुण्यामध्ये आंबिल ओढ्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका कर्मचारी, पोलीस पोहोचले तेव्हा स्थानिक जनता आक्रमक झाली. हे सर्व बिल्डरांच्या आदेशाने सुरू आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुण्याची सूत्रे सध्या बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात गेली आहेत. मुंबईच्याच जमिनी सोन्याच्या भावाने जात नाहीत. उलट पुणे याबाबतीत मुंबईच्या पुढे पाच पावले गेले आहे. आंबिल ओढ्यातील कारवाईने ते पुन्हा सिद्ध झाले असे सामना म्हंटले आहे.
सदर प्रकार धक्कादायक, संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा आहे. पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील नागरिकांचा आक्रोश एव्हाना सरकारच्या कानापर्यंत गेलाच असेल. या परिसरातील घरांवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली व घरे पाडण्यास सुरुवात केली तेव्हा लोक रस्त्यावर उतरून रडत या कारवाईचा विरोध करत असल्याचे चित्रण वृत्तवाहिन्यांनी दाखवले असे सुद्धा आजच्या अग्रलेखात म्हंटले आहे.