महाड | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही कोकणच्या भेटीला पोहोचत आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे आणि विधपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सुद्धा सोबत आहे. यावेळी या तिन्ही नेत्यांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता.
तळीये दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केली.
राणे म्हणाले की, ही अत्यंत दुखद घटना आहे. या दुर्घटनेत ८७ लोक गेल्याचं कळतं. ४४ मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं राणे म्हणाले.