मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी चर्चा राज्याच्या राजकारणात होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. देशभरात कोट्यवधी लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचे काही घेणे देणे नाही. नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
पुढे बोलताना खळबळजनक दावा करताना पटोले म्हणाले की, मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचे अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. पंतप्रधानपदी महाराष्ट्राचा माणूस विराजमान होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे असे विधान पटोले यांनी केले आहे.नितीन गडकरींचे मोदींसमोर चालते की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटते की नितीन गडकरी हे देशाचे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच करत आहेत. याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत, हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे.भाजपचेच काही नेते मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी करत आहेत. आमचा चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.