पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद पाहायला मिळत आहे. तसेच राष्ट्र्वादीने भाजपच्या अनेक नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट भाजपाचे आमदार फोडण्याचा इशारा देत फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता.
“भाजपचे सरकार येईल असं खोटं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत असतात. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास नको म्हणून आम्ही गप्प आहोत. अन्यथा भाजपचा आमदार फुटला आणि आणखी एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले होते.
तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघासाठी भारत नानांनी बरेच कष्ट घेतले आहेत. म्हणूनच पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने भल्याभल्यांना बाजूला ठेवून तीन वेळा भारत नानांना निवडून दिले. आजही तीच परिस्थिती आहे, काहींनी धनदांडग्यांना उमेदवारी दिली असली तरी लोकांनी भगीरथ भालके यांना खंबीर पाठिंबा दिला आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.