राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर भाजपा आमदार राम सातपुते यांनी उडी घेत खडसे एकण्यावर टीका केली होती. आता वडिलांवर केलेल्या टीकेला माजी आमदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राम सातपुते यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या गोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल’ असं ट्वीट राम सातपुतेंनी केलं होतं.
यावर आता रोहिणी खडसे यांनी आमदार राम सातपुते यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ‘अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?’ अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती.