बिहार राज्यातील कटिहार येथील महापौर शिवराज पासवान यांची गुरुवारी रात्री काही अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली आहे. काम आटोपून घराच्या दिशेने निघालेले पासवान यांना मारण्यासाठी वाटेत निर्मनुष्य ठिकाणी काही अज्ञात आरोपी दबा धरून बसले होते. पासवान संतोषी चौक रेल्वे गेट परिसरात पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर ताबडतोब हल्ला केला. या हल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनेनतंर पोलिसांनी सूत्र फिरवून या घटनेचा चाड लावला आहे.
महापौर पासवान यांच्या हत्या प्रकरणात एका भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या नातेवाईकाचं नाव समोर आलं आहे. मात्र अद्याप हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याची माहिती समोर आली नाही, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आमदार कविता पासवान यांच्या भाच्यासोबत १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार जमीन खरेदी विक्रीच्या कारणांतून महापौर शिवराज पासवान यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याच अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत. पुढील ४८ तासांत हत्येचा खुलासा केला जाईल. अटक केलेले सर्व आरोपी कटिहार शहराच्या आसपासच्या परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
