राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात CBI ने गुन्हा नोंद केला आहे. तसेच CBI ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले आहेत. या छापेमारीमुळे पुन्हा एकदा आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लगावले आहे.
‘सचिन वाझे २००० कोटींची वसुली गँग प्रकरणात आता अनिल देशमुखांवर कारवाई होत आहे. मात्र शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांचीही थोड्या दिवसात हीच स्थिती होईल. आणखी २ मोठे नेते लाभार्थी आहेत. २ हजार कोटी गोळा झाले. ते कुठे कुठे गेले? आता सीबीआय कारवाई करतेय. ईडी तपास करतेय. एनआयए आहे. पुढील काही दिवसांत आयकर विभागदेखील येईल. उद्धव ठाकरेंना २ हजार कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागेल असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार CBI कडून सुरू असलेली अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी काल पूर्ण झाली. त्यानंतर आज देशमुख यांच्याविरोधात FIR नोंदवला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं गेल्याच आठवड्यात या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती सोपवला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही, हे पाहण्यासाठी न्यायालयानं सीबीआयला १५ दिवसांचा कालावधी दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं देशमुख आणि इतरांची चौकशी सुरू केली.