राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा गळती लागली आहे. त्यात भाजपचा गाद म्हणून ओळखला जाणारा विदर्भात आता काँग्रेस पुन्हा एकदा मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. तसेच विदर्भात काँग्रेस कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदेश काँग्रेसचं उद्यापासून मिशन विदर्भ सुरु होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून संपूर्ण विदर्भाचा दौरा सुरु करणार आहेत.
या दौऱ्यात नाना पटोले विदर्भात काँग्रेस अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे. नाना पटोले रविवारी गोंदियामधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला रामराम ठोकत भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांची यावेळी घरवापसी होणार असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. मात्र नाना पटोले यांच्या या दौऱ्याला किती यश मिळते हे येणाऱ्या दिवसात दिसून येणार आहे.
विदर्भ हा भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. भाजपचा हा गड भेदण्यासाठी काँग्रेसचं मिशन विदर्भ सुरु झालं आहे. पक्ष मजबूत करणे, पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना परत आणणे, कार्यकर्त्यांना पुढील कार्यक्रम देणे, यासाठी नाना पटोले उद्यापासून विदर्भाचा दौरा करणार आहेत. विदर्भातील प्रत्येक जिल्हयात जावून ते पक्ष उभारणीवर विशेष भर देणार आहे. नाना पटोले उद्या गोंदिया जिल्ह्यापासून आपल्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात करणार आहेत, तशी माहिती त्यांनी दिली आहे.
दोनच दिवसांपूर्वी गांधी भवन येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत गुरुवारी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना पक्षातील शेकडो सदस्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.