पश्चिम बंगाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियो यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.
बाबुल सुप्रियो यांनी पक्ष बदलल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. शुक्रवारी त्यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला ते म्हणाले की, “मी द्वेष आणि फुटीरतावादी राजकारणामुळे पक्ष (भाजप) सोडण्याचा निर्णय घेतला. मी अशा प्रकारच्या राजकारणाशी अधिक संलग्न होऊ शकत नाही.”
याचबरोबर, बाबुल सुप्रियो यांच्या मते, “आसनसोलच्या लोकांना माहित आहे की मी बंगालमध्ये 70:30 किंवा 80:20 सारखे सांप्रदायिक आणि संकुचित विचारसरणीचे राजकारण कधीच केले नाही आणि करणार नाही.”
दरम्यान, बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. बाबुल सुप्रियो यांना केंद्रात मंत्रीपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भाजप सोडला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजप सोडला आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.