कासारवाडी परिसरात भर पावसात सुरू असलेली खोदाई व विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आलेल्या महिलांना आयुक्तांनी वेळ न दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकत आंदोलन केले. अचानकपणे झालेल्या या प्रकारानंतर तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी भाजपाच्या नगरसेविका अशा शेंडगे यांच्यासह काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारी कनेक्टिव्हिटी करण्यासाठी भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. शहरातील इतर भागांमध्ये हे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. तर कासारवाडीमध्ये हे काम अद्याप अपूर्ण आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करायचे असल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी या भागात खोदकाम करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. मात्र, स्थानिक नगरसेविका आशा शेंडगे यांचा त्या कामाला विरोध असल्याची तक्रार स्मार्ट सिटीचे शहर अभियंता अशोक भालकर यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे बुधवारी हे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले.
या कामावर आक्षेप घेत, काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. तसेच भर पावसाळ्यात हे काम सुरू केल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी बुधवारी केली होती. मात्र, तरीही काम सुरूच असल्याने गुरुवारी काही महिला कार्यकर्त्यांसह आशा शेंडगे महापालिकेतील आयुक्तांच्या कक्षासमोर आल्या.