खोटे आरोप केल्याचे म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. यावरून वातावरण चांगलेच तापले होते. आता वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे १२५ कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर 50 कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे.
काँग्रेस नेते व मंत्री वडेट्टीवार यांनी काल पडळकरांचे सर्व आरोप फेटाळत म्हटले होते की, पडळकरांनी ऐकीव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिलेले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईन.
माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असही ते म्हणाले होते. आता या टीकेला वडेट्टीवार काय उत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.