नवी दिल्ली | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु असतानाच आता सोमवारी देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित शाह आणि फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे खासदार रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील शनिवारपासून दिल्लीत आहेत. रविवारी त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो असं त्यांनी स्पष्ट केलं होत.